अमळनेर, लोक न्यूज :
नागरिकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विभागातील वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दीड महिन्यात अमळनेर विभागांतर्गत ७७१ वाहनांवर कारवाई करून तब्बल ७ लाख ९२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) विनायक कोते यांनी दिली.
मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, परवाना नसताना वाहन चालवणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देणे, हेल्मेटचा वापर न करणे, रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणे तसेच खराब स्थितीतील वाहने रस्त्यावर आणणे यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. त्यामुळे कुटुंबांवर आर्थिक व मानसिक संकट कोसळत असल्याचेही कोते यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर अमळनेर, पारोळा, एरंडोल आणि मारवड पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली.
अमळनेर हद्दीत सर्वाधिक कारवाई
अमळनेर पोलीस हद्दीत मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ अंतर्गत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर, कलम १८५ अंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १६ वाहनचालकांवर तसेच इतर ४०१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ४ लाख ८९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पारोळा हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ९, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४ आणि इतर ६५ वाहनांवर कारवाई करून ६० हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
एरंडोल पोलीस स्टेशन हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १६ आणि इतर १५२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून १ लाख ३२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मारवड हद्दीत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ आणि इतर ६७ वाहनांवर कारवाई करून १ लाख १० हजार २०० रुपयांचा दंड करण्यात आला.
नियम पाळा, अन्यथा कठोर कारवाई
अवैध प्रवासी वाहतूक, कर्कश सायलेंसरचा वापर, मद्यपान करून वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे तसेच रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरोधात सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांना शिक्षा देणे हा उद्देश नसून वाहतूक नियमांचे पालन होऊन शिस्त निर्माण व्हावी आणि अपघात टळावेत, हा या मोहिमेचा मुख्य हेतू असल्याचे डीवायएसपी विनायक कोते यांनी स्पष्ट केले. मात्र, निष्काळजीपणामुळे कोणाचाही जीव धोक्यात येत असेल तर कठोर कारवाई करण्यास पोलिसांना नाईलाज असल्याचेही त्यांनी सांगितले.