लोक न्यूज
अमळनेर : शेतकी संघाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवत 15 पैकी 10 जागांवर यश संपादन केले. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्विवाद बहुमत प्राप्त झाले असून सहकार क्षेत्रातील आमदार अनिल पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
तर काँग्रेसला तीन जागांवर समाधान मानावे लागले असून खासदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. या निकालामुळे अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख राजकीय पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
इंदिरा भवन येथे सोमवारी सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडली. सर्वप्रथम व्यक्तिशः मतदारसंघाची मतमोजणी करण्यात आली. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.
त्यानंतर महिला मतदारसंघाच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही महिला उमेदवारांनी विजय मिळवला. येथेही भाजप आणि काँग्रेसच्या महिला उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.
सोसायटी मतदारसंघात पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळवला, तर भाजपला दोन जागा मिळाल्या. यातील एका जागेसाठी दोन उमेदवारांना समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. त्यात भाजपचे प्रफुल पवार विजयी झाले.
ओबीसी, एससी-एसटी आणि व्हीजेएनटी या तीनही राखीव प्रवर्गांतील जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत भाजप व काँग्रेसला धक्का दिला.
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर मोठा जल्लोष केला. आमदार अनिल पाटील यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला.
पॅनल टू पॅनल मतदानातही राष्ट्रवादी आघाडीवर
व्यक्तिशः मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला सुमारे 2200 पॅनल टू पॅनल मते मिळाल्याचे दिसून आले. काँग्रेसला सुमारे 1500 तर भाजपला जवळपास 1000 मते मिळाली. अनेक मतदारांनी नियमानुसार पाच उमेदवारांऐवजी सहा उमेदवारांना मतदान केल्याने मोठ्या प्रमाणात मतपत्रिका बाद झाल्या. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे मानले जात असून अन्यथा आणखी दोन जागा त्यांच्या खात्यात जमा झाल्या असत्या.
निकाल असा
व्यक्तिशः मतदारसंघ : एकूण मतदान – 7,925
बाद मते – 873
विजयी उमेदवार :
प्रा. सुभाष पाटील (काँग्रेस) – 3,453
सुरेश पिरन पाटील (काँग्रेस) – 2,828
प्रा. श्याम पवार (काँग्रेस) – 2,286
संभाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2,925
संजय पुनाजी पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2,752
महिला मतदारसंघ : एकूण मतदान – 7,426
बाद मते – 605
विजयी :
सुषमा वासुदेव देसले (राष्ट्रवादी काँग्रेस) – 3,254
मालुबाई बापूराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 2,786
सोसायटी मतदारसंघ : एकूण मतदान – 106
विजयी :
नितीन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 71
गणेश भामरे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 69
सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) – 53
जितेंद्र पाटील (भाजप) – 53
प्रफुल पवार (भाजप) – ईश्वर चिठ्ठीद्वारे विजयी
ओबीसी मतदारसंघ :
विक्रांत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
एससी-एसटी मतदारसंघ :
शंकर बंडू बैसाणे (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
व्हीजेएनटी मतदारसंघ :
रणजित भीमसिंग पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी
मतदारांनी राष्ट्रवादीवर विश्वास दाखविला – आमदार अनिल पाटील
विजयानंतर प्रतिक्रिया देताना आमदार अनिल पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, “शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची भूमिका होती. मात्र काहींनी जागांचा आग्रह धरल्याने निवडणूक झाली. आज 15 पैकी 10 जागा जिंकल्या असल्या तरी पॅनल टू पॅनल मतदानाचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट होते. बाद मतांमुळे आमच्या किमान दोन जागा कमी झाल्या. हा निकाल म्हणजे मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दाखविलेला विश्वास असून पुढील काळात शेतकी संघाची प्रगती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही अधिक जोमाने काम करू.”