लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदी पात्रात सापडलेल्या अवैध डिझेल साठ्याबाबत संबंधित मालकाकडून समाधानकारक खुलासा न आल्याने जप्त करण्यात आलेले १४७० लिटर डिझेल शासन जमा करून त्याची विक्री करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी २९ मे रोजी दिले आहेत.
सावखेडा परिसरातील वाळू ठेक्यांवर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळाधिकारी कल्याणी पाटील, प्रभारी पुरवठा निरीक्षक सचिन निकम आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने २८ मे रोजी अचानक छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान गिरीश तुळशीराम बेलदार यांच्या ताब्यात सुमारे ७ कॅनमध्ये १४०० लिटर आणि अन्य ३ कॅनमध्ये ७० लिटर असा एकूण १४७० लिटर डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आला. या डिझेलची अंदाजे किंमत सुमारे १ लाख ५५ हजार रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
महसूल पथकाने हा साठा जप्त करून अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच संबंधित मालकाला कलम ६ अन्वये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदतीत कोणताही खुलासा सादर न केल्याने उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी हा डिझेल साठा जप्त करण्याचा अंतिम आदेश दिला.
अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ६ व ६-अ नुसार जप्त मालाची विल्हेवाट लावण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राप्त असल्याने त्यांनी जप्त डिझेल विक्रीचा निर्णय घेतला. यासाठी शहरातील विविध पेट्रोल पंपांकडून डिझेलचे दर मागविण्यात आले होते. त्यामध्ये धुळे रस्त्यावरील श्रीकृष्ण पेट्रोल पंप (नायरा) यांचा प्रतिलिटर १०१.५७ रुपये हा दर सर्वाधिक असल्याचे आढळून आले.
त्यामुळे जप्त करण्यात आलेला संपूर्ण डिझेल साठा श्रीकृष्ण पेट्रोल पंपास विकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम ‘क्रिमिनल डिपॉझिट (८४४३)’ या लेखाशीर्षकाखाली शासन जमा करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत.
या कारवाईमुळे तापी नदी पात्र परिसरातील अवैध इंधन साठा आणि वाळू व्यवसायाशी संबंधित गैरप्रकारांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.