लोक न्यूज
अमळनेर:- शहराचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या १९४.५४ कोटींच्या पाडळसरे धरणावरील नवीन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. रविवार दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली व सद्यस्थितीचा आढावा घेतला.
विशेष म्हणजे शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही यावेळी आपल्या नगरसेवकांसोबत उपस्थिती लावल्याने शहराच्या विकासासाठी आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र असल्याचे संकेत मिळाले. आमदार अनिल पाटील सकाळी ७:३० वाजताच शहर विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह पाडळसरे धरणावर पोहोचले. त्यांच्यासोबत नगराध्यक्ष डॉ. बाविस्करही नगरसेवकांसह उपस्थित झाले. पाडळसरे नजीक तापी नदीच्या काठी सुरू असलेल्या कामाच्या स्थळी दोघांनी भेट दिली.
*कामाची स्थिती:*
याठिकाणी १ इंटेकवेल, ३ इन्फेक्शन वेल, १ जॅकवेल आणि कनेक्टिंग मेनचे काम जोमाने सुरू आहे. सदरचे काम २० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून कामाला गती देण्याच्या सूचना आमदारांनी केल्या. नगराध्यक्षांनीही काही सूचना यावेळी केल्या.तांत्रिक बाजूही त्यांनी जाणून घेतल्या.
याप्रसंगी न.प.चे मुख्याधिकारी गणेश शिंदे, न.प. अभियंता बैसाणे, मानव सेवा कन्सल्टंट धुळे चे राजेंद्र सोनार व विवेक पाटील, ठेकेदार जितेश ठाकरे व राज राठोड उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण कामाचा आढावा दिला.
*योजनेची वैशिष्ट्ये:*
दोन वर्षांपूर्वी १९४.५४ कोटींची ही २४x७ योजना आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी मंजूर झाली. पाडळसरे धरणावर वर्षभर जलसाठा राहत असल्याने ही योजना अमळनेर शहरासाठी ‘जलरक्षक’ ठरणार असून योजना पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना दररोज पाणी मिळणार आहे. सदर योजनेचे जवळपास ३५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. शहरात २११.५ किमी पैकी ९२ किमीहून अधिक पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ढेकू रोडवरील नवनाथ टेकडीवर २८ एमएलटी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात असून याचेही काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. याशिवाय १८.६० लक्ष लिटर व १९.५८ लक्ष लिटर क्षमतेच्या मोठ्या जलकुंभांचे कामही प्रगतिपथावर आहे.या योजनेत सोलर प्रोजेक्टची तरतूद असल्याने वीज बिलातही मोठी बचत होणार आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात अमळनेरकरांना पाणी टंचाईची झळ बसल्याने ही योजना लवकरात लवकर पूर्णत्वास यावी, यासाठी आमदार अनिल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.त्याच उद्देशानेच आमदारांनी हा विशेष पाहणीचा दौरा केला.यावेळी कामाची प्रगती पाहून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शहर व ग्रामिण पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.