लोक न्यूज
जळगाव – चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात झालेल्या भयावह घटनेत आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुन्या बारेला (वय 22, रा. पाटचारी) याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीवर चोपडा शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 454/2024, स्पेशल केस नं. 57/2024 अंतर्गत भा.न्या.सं. कलम 65, 66, 103(1) तसेच POCSO Act कलम 4, 5, 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेच्या तपासानुसार, दि. 07/09/2024 रोजी फिर्यादीच्या मुली शेतात निंदणीसाठी गेल्या होत्या. सायंकाळी तीन मुली रडत घरी परत आल्या व त्यांनी सांगितले की आरोपीने त्यांच्या बहिणीस जबरदस्तीने शेतात ओढून नेले. पुढील शोधात पिडीता भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात मृतावस्थेत आढळली. तिच्या डोक्यावर गंभीर जखम असून घटनास्थळी रक्ताचे पुरावेही सापडले.
तपासात आरोपीने पिडीतेवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी एकूण 14 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात मांडली, ज्यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी मुली आणि वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता. डीएनए अहवाल, वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या कपड्यांवरील रक्त व इतर वैज्ञानिक पुरावेही न्यायालयात सिद्ध करण्यात आले.
सरकारी वकीलांनी आरोपीच्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप दाखवून फाशीची मागणी केली, मात्र मा. जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी आरोपीला “मरेपर्यंत जन्मठेप”ची शिक्षा सुनावली. तसेच पिडीतेच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही दिले आहेत.
तपासात पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय वल्टे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, नायब तहसीलदार योगेश पाटील आणि विविध पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.