लोक न्यूज
अमळनेर येथील ऐंशी फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेस फिरणाऱ्या महिलेवर डुकराने मागून हल्ला करीत जखमी केल्याची घटना काल ता. 20 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
शहरातील मुंदडा नगर ते आर. के नगर भागातील ऐंशी फुटी रस्त्यावर रात्रीच्या वेळेस आठ ते दहा वाजेपर्यंत महिला व पुरुषांचा पायी फिरण्यासाठी गर्दी असते. काल रात्री महावीर नगर मधील महिला योगिता सहदेव पाटील त्यांच्या मुलीसोबत त्या ऐंशी फुटी रस्त्यावर फिरत असताना मागून अचानक त्यांच्यावर डुकराने हल्ला केल्याने त्यांना पायाला मोठया प्रमाणात जखमी झाल्याने त्यांना तात्काळ डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना गुडघ्याच्या मागील बाजूस चावा घेतला आहे. यावेळेस डुकराने केलेला हल्ला इतका भयावह होता की,सोबत असलेल्या मुलीने जोरदार प्रतिकार केल्यामुळे आईला ती या हल्ल्यातून वाचवून लागलीच आरडा ओरड करीत आईला दवाखान्यात दाखल केले. मात्र या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
*एका आठवड्यात तीसरी घटना*--- शहरात डुकरांचा वावर वाढला असून नगर पालिका प्रशासनाने यावर लागलीच कारवाई करीत डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असून ऐंशी फुटी रस्त्यावरील एका आठवड्यात तिसरी घटना असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती यांना शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्रे, डुकरे, जनावरे यांचा त्रास वाढला असूनही प्रशासन कुंभकर्णी झोप घेत आहे का? असाही प्रश्न जनतेला पडला आहे.
गावात फिरणारे मोकाट जनावरांबाबत नोटीसा दिल्या आहेत, मोकाट कुत्र्यांवरही बंदोबस्त करण्यात येणार असून प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक नोडेल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांनी त्या शालेय परिसरातील माहिती दिल्यास बंदोबस्त करण्यात येईल.शहरातील डुक्कर पालन करणारे यांना नोटीसा देण्यात आली आहे.त्यांनी आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
किरण कंडारे -स्वछता निरीक्षक नगर पालिका अमळनेर