लोक न्यूज
धुळे, दि. १२ मे २०२६ — धुळे तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बोलेरो वाहनावरील हल्ल्याच्या प्रकरणात फिर्यादी महिलेने दिलेल्या पुरवणी जबाबामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या दोन व्यक्तींनी मदत केली होती, तर प्रत्यक्ष हल्लेखोर इतरच असल्याचे फिर्यादीने स्पष्ट केले आहे.
सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर (वय ४८, रा. अमळनेर, जि. जळगाव) यांनी पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबानुसार, १२ मे रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या बोलेरो वाहनाने वणी (ता. जि. धुळे) गावाजवळून प्रवास करत होत्या. त्यांच्यासोबत भाऊ भुपेंद्र रमेश चव्हाण आणि चालक राहुल संजय पाटील उपस्थित होते.
यावेळी एमएच ०२ बीआय १९०२ क्रमांकाच्या वाहनातून तसेच एका मोटारसायकलवरून आलेल्या काही अनोळखी इसमांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. अचानक वाहनासमोर येत आरोपींनी बोलेरोच्या पुढील व मागील टायरजवळ लाकडी खिळ्यांचा रॉड टाकून वाहन पंक्चर केले. त्यानंतर गाडीवर हल्ला करून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्राथमिक फिर्यादीत प्रणील गंगाधर मंडलीक (रा. मंगलनगर, साक्री रोड, धुळे) आणि निलेश रघुनाथ पाटील (रा. जुनवणे, ता. जि. धुळे) यांची नावे नमूद करण्यात आली होती. मात्र पुरवणी जबाबात फिर्यादीने सांगितले की, ही नावे चुकून फिर्यादीत आली असून संबंधित दोघे मदतीसाठी आले होते.
घटनेतील प्रत्यक्ष हल्लेखोर म्हणून फिर्यादीने आता
१) मिलींद पाटील (रा. वरखेडी),
२) सौरभ जाधव (रा. दंडेवाला बाबा नगर, मोहाडी उपनगर, धुळे),
३) प्रमोद देविदास सोनवणे (रा. बाळापूर, ता. जि. धुळे)
यांची नावे नमूद केली आहेत.
दरम्यान, धुळे तालुका पोलिसांनी पुरवणी जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.