लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यात आपत्कालीन ११२ डायल सेवेला खोटे आणि विनाकारण कॉल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे पोलिसांचा वेळ, मनुष्यबळ आणि वाहनांचे इंधन वाया जात असल्याचे समोर आले आहे. यापुढे खोटे अथवा निरर्थक कॉल करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.
जनतेच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आलेली ११२ डायल सेवा अत्यंत तत्परतेने कार्यरत असून अवघ्या १५ मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचून मदत करत आहेत. मात्र काही टवाळखोर, दारुड्या आणि वात्रट व्यक्तींकडून विनाकारण कॉल करून पोलिसांना त्रास दिला जात आहे.
६ मे रोजी ८ कॉल, ७ मे रोजी ११ कॉल, ८ मे रोजी तब्बल ४५ कॉल तर ९ मे रोजी २३ कॉल प्राप्त झाले. यातील अनेक कॉल हे खोटे व निरर्थक असल्याचे निष्पन्न झाले. एका व्यक्तीने तर एसटी बसमध्ये जागा मिळत नसल्याने “मला जागा मिळवून द्या” अशी मागणी करत ११२ वर कॉल केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले की, ११२ वर आलेल्या प्रत्येक कॉलला पोलिसांकडून गांभीर्याने प्रतिसाद दिला जातो. वरिष्ठांच्या आदेशानुसार सर्व कामे बाजूला ठेवून कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतात. प्रत्येक कॉलवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवालही तत्काळ सादर करावा लागतो. अशा परिस्थितीत खोट्या तक्रारींमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
त्यामुळे यापुढे बनावट, खोटे किंवा विनाकारण ११२ डायल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पोनि दत्तात्रय निकम यांनी दिला आहे.