अमळनेर (लोक न्यूज) – शहरात गेल्या दीड महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दहा-दहा दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. जनतेच्या जीवावर नगरपालिका सत्ता मिळवून दोन दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देणारे माजी आमदार व पालिकेतील सत्ताधारी आता जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
अनिल पाटील म्हणाले की, अमळनेरमधील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी कर भरत असूनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे ढासळले असून पाण्याच्या टाक्या पुरेशा भरल्या जात नाहीत. दहा दिवसांनंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
पालिकेतील काही नगरसेवक आपल्या भागात अधिक पाणी सोडण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीही आपल्याकडे आल्याचा दावा त्यांनी केला. “जनतेकडून कर वसूल केला जातो, तर त्यांना पुरेसे पाणी देणे हे पालिकेचे कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले.
जळोद डोहातील पाणी आटत असल्याने गंगापुरी डोहातून पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत त्यांनी आवर्तन तातडीने घेण्याची मागणी केली. “आवर्तनासाठी ४० लाख रुपये खर्च झाले तरी तो जनतेचाच पैसा आहे. एक काम कमी करा पण नागरिकांना पाणी द्या,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी तातडीने निर्णय न घेतल्यास शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अनिल पाटील यांनी दिला.
२०० कोटींची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात?
अनिल पाटील यांनी सांगितले की, अमळनेर शहराची पुढील ५० ते ६० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन २०० कोटी रुपयांची “२४ बाय ७” पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शहरात पाइपलाइन टाकण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही योजना थंडबस्त्यात गेल्याचा आरोप त्यांनी केला. “मतदारसंघाचा पालक म्हणून मी स्वतः या योजनेकडे लक्ष घालणार असून लवकरच कामाला गती मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यात्रोत्सव नियोजनावरही टीका
बोरी पात्रातील पारंपरिक यात्रोत्सवाच्या नियोजनावरही अनिल पाटील यांनी टीका केली. यात्रेत प्रथमच ठेकेदारी व वसुलीचा प्रयोग करण्यात आल्याने बाहेरगावाहून आलेले विक्रेते आणि पाळणेवाले नाराज झाले असून संपूर्ण नियोजन कोलमडल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच, जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना “बाहुले” बनवून ठेवण्यात आले असल्याचा आरोप करत, लोकप्रतिनिधींनी स्वतंत्रपणे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.