लोक न्यूज
भारत सरकारच्या ‘जनगणना २०२७’ मोहिमेअंतर्गत सुरू झालेल्या ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) उपक्रमाला अमळनेर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात पुढाकार घेत मा. आमदार अनिल पाटील आणि नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी स्वतःची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली.
‘आमची जनगणना, आमचा विकास’ या ध्येयवाक्याखाली प्रथमच नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाद्वारे स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मान्यवरांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन कुटुंबाची माहिती भरून ‘SE ID’ प्राप्त केला.
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, शहराच्या पुढील विकासाचे नियोजन जनगणनेतील आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे सर्व नागरिकांनी १५ मेपूर्वी ‘स्व-गणना’ पूर्ण करावी.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ऑनलाइन प्रक्रियेनंतर मिळालेला ‘SE ID’ सुरक्षित ठेवावा. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरोघरी भेट देतील, त्यावेळी फक्त हा ‘SE ID’ दाखविल्यास सर्वेक्षण प्रक्रिया जलद होईल.
अमळनेर शहराची १०० टक्के अचूक माहिती शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नागरिकांनी या डिजिटल उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.