लोक न्यूज
अमळनेरच्या चोपडा रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळील खदाणीत मंगळवारी सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन अल्पवयीन मित्रांचा बुडून मृत्यू झाला. खदाणीतील बेटासारख्या उंचवट्यावर सेल्फी काढत असताना एका मुलाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या दोन्ही मित्रांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करून तिन्ही मुलांना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उधवानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) यांचा समावेश आहे. तिघेही अमळनेरच्या सिंधी कॉलनीतील रहिवासी होते.
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण अमळनेर शहरात शोककळा पसरली असून, पावसाळ्यात खदाणी, तलाव व इतर खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.