छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील वर्डलँड पब्लिशिंग हाऊस तर्फे ज्येष्ठ साहित्यिक ठा. धोंडिरामसिंह राजपूत लिखित 'लढा' हा स्त्री साहित्यावर आधारित काव्यसंग्रह प्रकाशित होत असून, या काव्यसंग्रहाबाबत सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव (आय.पी.एस.) यांनी गौरवोद्गार व्यक्त केले आहेत. जीवनातील प्रत्येक संघर्षाला स्पर्श करणारा आणि समाजाला दिशा देणारा हा काव्यसंग्रह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. जाधव यांनी आपल्या अभिप्रायात नमूद केले आहे की, 'लढा' काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता अनुभवसंपन्न लेखणीची साक्ष देणारी असून मानवी जीवनातील विविध संघर्षांचे प्रभावी चित्रण त्यात आढळते. स्त्रीच्या जीवनातील संघर्ष, शेतकऱ्यांचा लढा, अपंग व्यक्तींचे जीवन, शहीदांचे बलिदान, वृद्धापकाळातील वेदना, युवकांचे प्रश्न, सैनिकांचे कर्तव्य, लेकीबाळींचे जीवन, हुंडाविरोधातील लढा, आजार, महागाई, भ्रष्टाचार, सामाजिक समस्या तसेच स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक आणि राष्ट्रभक्तांच्या संघर्षाचा प्रभावी वेध या काव्यसंग्रहात घेण्यात आला आहे.
याशिवाय स्वच्छता, जलसंपत्ती, मुलींचे कर्तव्य, बापाचे कर्तव्य, देशभक्ती, ऑपरेशन सिंदूर, संस्कार, मानवी धर्म, मराठी भाषा, पहिली शाळा, वटसावित्री पौर्णिमा, आई, महिला सक्षमीकरण, बालमजुरी, रक्तदान, अन्नभेसळ, शेतकरी जीवन, मोबाईलचा वापर, स्वावलंबन, स्वदेशी वस्तू, आत्मनिर्भरता, माहेर, भूक आणि अन्न यांसारख्या विविध सामाजिक विषयांवरही कवीने संवेदनशीलतेने भाष्य केले आहे.
स्त्रीभ्रूणहत्येच्या विषयावर कवीने अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडलेले वास्तव डोळ्यात पाणी आणणारे असल्याचे डॉ. जाधव यांनी नमूद केले. तसेच 'नराधम' या कवितेत महिलांवरील अत्याचार आणि शासन-प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कवीने परखड शब्दांत प्रहार केला असून समाजाला अंतर्मुख करणारा संदेश दिला आहे, असे त्यांनी म्हटले.
मराठवाडा ही साहित्यिकांची भूमी असून या भूमीने मराठी साहित्याला अनेक नामवंत कवी-लेखक दिले आहेत. दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, अनुभव, व्यापक वाचन आणि प्रभावी शब्दसंपदा ठा. धोंडिरामसिंह राजपूत यांच्या लेखणीत दिसून येते. त्यांनी आपल्या साहित्याचा उपयोग समाजप्रबोधनासाठी प्रभावीपणे केला आहे, असेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.
ठा. धोंडिरामसिंह राजपूत हे कवी, लेखक आणि समाजसेवक म्हणून परिचित आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील रहिवासी असलेल्या राजपूत यांनी १९६७ पासून साहित्यलेखनास प्रारंभ केला. अनेक नामवंत साहित्यिकांच्या सहवासात त्यांची साहित्यिक जडणघडण झाली. विद्यार्थीकेंद्री शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
आजपर्यंत त्यांनी पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'बैल पोळा' या कवितेचा समावेश इयत्ता पाचवीच्या स्टेट बोर्ड सुलभ मराठी या पाठ्यपुस्तकात गेल्या दहा वर्षांपासून असून राज्यातील लाखो विद्यार्थी ती कविता अभ्यासत आहेत. सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार' तसेच 'पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार' प्राप्त झाला आहे.
डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी 'लढा' हा काव्यसंग्रह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि साहित्य अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे वर्डलँड पब्लिशिंग हाऊसचे संपादक बाबा चन्ने यांच्या साहित्यसेवेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
शेवटी, वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही ठा. धोंडिरामसिंह राजपूत यांचा अखंड सुरू असलेला साहित्यप्रवास प्रेरणादायी असल्याचे सांगत, त्यांच्या लेखणीतून भविष्यातही समाजप्रबोधन करणारे दर्जेदार साहित्य निर्माण होत राहावे, अशा सदिच्छा डॉ. जाधव यांनी व्यक्त केल्या.