वैजापूर (लोक न्यूज)
उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी (ता. १५) वैजापूर शहर व तालुक्यातील शाळा विद्यार्थ्यांच्या चिवचिवाटाने गजबजून गेल्या. नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुठे गुलाब फुले देऊन, कुठे शैक्षणिक साहित्य व पुस्तके वाटून, तर कुठे चॉकलेट, फुगे, रांगोळी आणि खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
वैजापूर येथील पीएमश्री मौलाना आझाद विद्यालयात पालिका सभापती दशरथ बनकर, महेश भालेराव, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी अरुण शिंदे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत व मुख्याध्यापिका नीता पाटील यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, शैक्षणिक साहित्य देऊन प्रवेश फीत कापण्यात आली. विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले.
यावेळी धोंडीरामसिंह राजपूत यांनी “शिकू, शिकू, शिकू शाळा आपण शिकू” तसेच “शाळेत जाऊ या, शाळा शिकू या” या कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली व पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
तालुक्यातील खंडाळा व शिरूर गटात जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, सभापती श्रीमती जाधव तसेच पंचायत समिती सदस्य शेख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
शहरातील नगरपालिका शाळांमध्येही विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या प्रसंगी पालकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक बी. बी. जाधव, सुवर्णा बोर्डे, राजश्री बंड, वैशाली पगारे, सुभाष गोमलाडू, लता सुखासे, ज्योती दिवेकर, सुनीता वसावे, श्री. शेळके, क्रीडा शिक्षक श्री. बोढरे व श्री. तगरे यांनी विशेष सहभाग नोंदविला.