लोक न्यूज
अमळनेर, दि. १५ : शहरातील पिंपळे रोडवरील वामन नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी आज (दि. १५) नगरपालिकेत जाऊन नवीन व्हॉल बसविण्याची तसेच पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसांत सुरळीत करण्याची मागणी केली.
महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ रोजी झालेल्या पाणीपुरवठ्यावेळी वामन नगर परिसराला केवळ अर्धा तासच पाणी मिळाले. यापूर्वीही १२ मार्च २०२६ रोजी नागरिकांनी नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती, व्हॉलमन व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत निदर्शनास आणून दिले होते. तसेच वेळोवेळी दूरध्वनीद्वारे तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महिलांनी नगरपालिकेकडे नवीन व्हॉल बसविण्यात यावा किंवा पिंपळे रोडवरील मुख्य पाईपलाईनला जोडणी करून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महिलांनी नगरपालिकेत भेट दिली असता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती उपस्थित नसल्याने त्यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे निवेदन सुपूर्द केले.
येत्या आठ दिवसांत सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा तोंडी इशाराही महिलांनी यावेळी दिला.