भुसावळ - (रिपोर्ट)
भारताच्या पहिल्या "किसान रेल" चे उद्घाटन  कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर , यांनी  दिनांक ७ रोजी व्हिडिओ लिंकद्वारे देवळाली ते दानापूर पर्यंतच्या भारताच्या पहिल्या "किसान रेल" ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. 
    रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री,पीयूष गोयल  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी  सुरेश अंगडी,  रेल्वे राज्यमंत्री,  रावसाहेब दानवे,  ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, भारत सरकार,  परशोत्तम रुपाला आणि  कैलाश चौधरी, माननीय राज्यमंत्री कृषी व शेतकरी कल्याण, भारत सरकार,  देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते,महाराष्ट्र राज्य आणि  छगन भुजबळ,  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य,  हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार आणि डॉ. नरेंद्र  जाधव  आदि  खासदार यांच्यासमवेत श्रीमती.  सरोज अहिरे,  आमदार,  पुरनेंदू मिश्रा, सदस्य ट्रॅफिक, रेल्वे बोर्ड यांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे केले. 
      मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक  संजीव मित्तल यांनी  आपल्या  स्वागतपर भाषणात सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
 नरेंद्र सिंह तोमर संबोधित करताना म्हणाले की, माननीय पंतप्रधानांनी कल्पना केलेल्या दूरदर्शी योजने अंतर्गत  अर्थसंकल्पात किसान रेल ची घोषणा केली ही एक स्वागतार्ह पायरी आहे.  किसान रेल ची घोषणा करण्यामागे नाशवंत वस्तू वा पदार्थ  नष्ट होऊ नयेत व यासाठी  शेती उत्पादनांची दूरवर होणारी  वाहतूक  सुगम व्हावी हा हेतू  होता.  लॉकडाऊन दरम्यान जेव्हा सर्व काही थांबले होते, तेव्हा शेतकरी आणि रेल्वे कधीच थांबलेले नाहीत.  शेतकर्‍यांच्या उत्पादनाची वाहतूक रेल्वेने केली आणि राष्ट्राला कृषी उत्पादनांचे उद्दीष्ट साध्य करण्यात मदत केली.
 पीयूष गोयल यांनी संबोधित करताना सांगितले की,  पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की रेल्वे ही राष्ट्राची विकास इंजिन आहे.  लॉकडाऊन दरम्यान रेल्वे आणि कृषी या उभयतांनी काम केले आणि देशाच्या कानाकोप-यात धान्य पोहोचेल  याची दक्षता  घेतली.  ते पुढे म्हणाले, की काश्मीरच्या  सफरचंदांची वाहतूक रेल्वेमार्गे कन्याकुमारीला होऊ शकते. भारतातील पहिली रेल्वे १८५३ मध्ये मुंबईहून धावली  त्याचप्रमाणे किसान रेल ही सर्वप्रथम  मध्य रेल्वेतूनच  चालविली जात आहे.
 छगन भुजबळ,  अन्न, नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री विवेक कुमार गुप्ता यांनी आभार प्रदर्शन  केले. तत्पूर्वी किसान रेल वर एक छोटीशी चित्रफीतही दाखविण्यात आली.


 *किसान रेल - पार्श्वभूमी* 
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी व नाशवंत उत्पादनांचा अखंड पुरवठा साखळीसाठी “किसान रेल” सुरू करण्याच्या घोषणेनुसार, रेल्वे मंत्रालयाने आज दि. ७ ऑगष्ट रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची पहिली किसान रेल गाडीला सुरुवात केली आहे.
ट्रेन क्रमांक ००१०७ साप्ताहिक किसान रेल  दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवळाली येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ६ .४५ वाजता दानापूरला पोहोचेल.

 ट्रेन क्रमांक ००१०८ साप्ताहिक किसान रेल दर रविवारी दुपारी १२.०० वाजता दानापूर येथून सुटेल आणि दुसर्‍या दिवशी १९.४५ वाजता देवळालीला पोहोचेल.

 या ट्रेनमध्ये १० पार्सल व्हॅन आणि एक लगेजसह  ब्रेक व्हॅन असेल.

 किसान रेल एका  फेरीमध्ये ३१.४५ तासात १५१९ किमी अंतर कापते. ही रेल नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर या स्थानकांवर थांबेल.

 मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने कृषी आधारित क्षेत्र आहे, जिथे भाजीपाला (विशेषत: कांदे), फळे, फुले व इतर कृषी पदार्थांची मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आणि पाटणा-अलाहाबाद- कटनी-सतना या  प्रदेशात  उत्पादनांना मोठी मागणी आहे.  .  किसान रेल त्यांच्या उत्पादनांसाठी चांगली  बाजारपेठ उपलब्ध करुन देईल.  जास्तीत जास्त शेतकर्‍यांना याचा फायदा व्हावा म्हणून स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि एपीएमसी यांच्या सहकार्याने मध्य रेल्वेकडून मार्केटिंग  साठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.