लोक न्यूज
वैजापूर, ता. १८ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात तब्बल ३३ वर्षे नेत्रसेवा बजावून वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले नेत्रतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय साळवे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम बुधवारी (ता. १७) उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. कुसुमताई संजय साळवे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद हरबडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ठा. धोंडीरामसिंह राजपूत उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी डॉ. साळवे यांच्या ३३ वर्षांच्या समर्पित नेत्रसेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याचा गौरवशाली आढावा घेतला. तसेच सेवेनंतरचा त्यांचा जीवनप्रवास सुखी, समृद्ध आणि निरोगी जावो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल केलेल्या सन्मानाचाही यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.
डॉ. संजय साळवे यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळातील अनुभव, आठवणी आणि मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्ष-किरण अधिकारी किशोर वाघुले यांनी शेर-शायरीच्या बहारदार शैलीत केले. प्रास्ताविक शीतल बोढरे यांनी केले, तर आभार अर्चना वाघ यांनी मानले.
यावेळी नर्सेस विभागातील विद्या महाडीकर, रुख्मिणी गवई, विजया जंगम, श्रीमती सातदिवे, माया केदारे, मनीषा गायकवाड तसेच विजय पाटील, चौधरी, मापारी, लक्ष्मीकांत दुबे, संजय सागरे, श्याम उचित, भास्कर दुधारे, नागे पाटील आणि शशिकांत पाटील यांनी भेटवस्तू देऊन डॉ. साळवे यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.