लोक न्यूज
अमळनेर शहरात आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. हॉटेल, बार चालक आणि वाळू व्यवसायाशी संबंधित काही व्यक्ती अचानकपणे राजकारणात सक्रीय होताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “असे व्यवसाय करणारे लोक नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत असतील, तर जनतेने त्यांना खरंच पसंती देईल का?” असा सवाल शहरभरात चर्चिला जात आहे.
शहरातील सर्वसामान्य मतदारांची भूमिका अगदी स्पष्ट असल्याचे दिसते. ते प्रशासनात स्वच्छ प्रतिमा असलेला, साधा-सरळ, जनतेच्या अडचणी समजून घेणारा आणि प्रामाणिकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी पाहू इच्छित आहेत. शहरातील नागरिक सांगतात की, गेल्या काही वर्षांत वाळू माफियांचा वाढता दबदबा, तसेच बार चालकांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक नकारात्मक घटना घडल्या आहेत. यामुळे जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
“वाळू माफियांचे जाळे वाढतेय आणि काही बार चालकही राजकारणात उडी घेत आहेत. अशांनी जनता कशी विश्वास ठेवणार?” असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.
अनेक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या व्यवसायाशी संबंधित व्यक्तींवर आर्थिक आणि राजकीय स्वार्थांचे आरोप होण्याची शक्यता जास्त असल्याने ते खऱ्या अर्थाने सार्वजनिक हिताचे निर्णय घेतील का, याबद्दल शंका आहे. त्यामुळेच, आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचे झुकते वजन स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांकडे जाण्याचीच शक्यता अधिक असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मतही पुढे येत आहे.
शहरात सुरू असलेल्या चर्चांवरून स्पष्ट होते की, अमळनेरकर स्वच्छ प्रशासन व पारदर्शक नेतृत्व शोधत आहेत. पुढील काही दिवसात या चर्चांना कोणते रूप येते, हे पाहणे उत्सुकतादायक ठरणार आहे.