लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील नगाव खूर्द, नगाव बुद्रुक, गडखांब आणि पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस व मका पिके काढणीच्या अवस्थेत असतानाच पावसाने फटका दिल्याने पिकं ओलाव्यात कुजत आहेत.
आधीच बाजारात किमान दर न मिळाल्याने शेतकरी चिंतेत होता. त्यात या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा आघात केला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष मयूर अनिल बोरसे व विपुल किरणगीर गोसावी यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानीची भरपाई तत्काळ देण्याची मागणी केली आहे.
“अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून योग्य मूल्यमापन करण्यात यावे. मागील रखडलेली भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच आमदार अनिल दादा पाटील आणि खासदार स्मिता ताई वाघ यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाला तत्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
मयूर बोरसे यांनी सांगितले की,
“शासनाच्या जीआरनुसार अमळनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे.”
दरम्यान, तालुका प्रशासनाकडून प्राथमिक पाहणी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.