अमळनेर लोक न्यूज
गेल्या ३५ वर्षांपासून दाराशी उभ्या असलेल्या विजेच्या खांबामुळे त्रस्त असलेल्या अमळनेर येथील एका कुटुंबाला अखेर खांब हलवण्यास मंजुरी मिळाल्यानंतरही दिलासा मिळालेला नाही. कारण, काम सुरू होऊन तब्बल २० दिवस उलटले तरी ठेकेदार आणि वायरमन हजरच झालेले नाहीत. दरम्यान, खोदलेले खड्डे परिसरातील नागरिकांसाठी धोका बनले आहेत.
गांधलीपुरा भागातील पारधी वाड्यात राहणारे शेख युनूस हकीम बेलदार यांनी अनेक वर्षांपासून घरासमोर उभ्या असलेल्या विजेच्या खांबाविरुद्ध लढा दिला. या खांबामुळे घरात येणे-जाणे कठीण झाले होते तसेच विजेच्या तारांचा धोका कायम होता. अखेर कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे आणि अभियंता हेमंत सैंदाणे यांनी खांब हलवण्यास मंजुरी दिली. हे काम ठेकेदार बोंडे यांना देण्यात आले.
मात्र, कामाच्या सुरुवातीला काही खड्डे खोदून ठेवल्यानंतर ठेकेदार आणि वायरमन गायब झाले. २० दिवसांपासून हे खड्डे उघडे असून परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. “एखादे मूल या खड्ड्यात पडून दुखापत झाली तर जबाबदार कोण?” असा सवाल शेख युनूस हकीम बेलदार यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक रहिवाशांनीही ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. “अशाच प्रकारे बोंडे यांची अनेक कामे अधांतरी राहिली आहेत. वेळेवर काम पूर्ण होत नाही आणि जबाबदारी टाळली जाते,” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
विद्युत विभागाच्या अभियंत्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, खड्डे भरावेत आणि नागरिकांचा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.