.         सभापती अशोक आधार पाटील

.              सौ. योगिता अशोक

अमळनेर (लोक न्यूज): 
अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता तो खर्च आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा सभापती पाटील यांचा वाढदिवस कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारीवृंद, विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, आधार फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच “अशोक भाऊ मित्रमंडळ” या संघटनेतर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे, खेडी, खर्दे आदी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सभापती पाटील यांनी आपला वाढदिवस न साजरा करता वाढदिवसाचा सर्व खर्च या गावांतील गरजवंत शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. सभापती पाटील यांच्या अर्धांगिनी तथा आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. योगिता अशोक पाटील या मुडी मांडळ गटातून उमेदवारी इच्छुक असून त्यांनीही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
अशोक पाटील म्हणाले, “माझ्यावर प्रेम करणाऱ्या मित्रपरिवार, हितचिंतक व कर्मचारीवृंद यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू देण्याऐवजी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत करावी. असा वाढदिवस साजरा झाला तर तोच शेतकरीपुत्राला शोभणारा खरा वाढदिवस ठरेल.”
सभापतींच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.