लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या राजकीय हालचालींनी चर्चेला उधाण आले आहे. एकेकाळी मतदारसंघातील लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील नेता म्हणून ओळखले जाणारे पाटील आज जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत, परंतु यावेळी ती चर्चा त्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे.राजकीय भुलभुलय्या आणि अस्तित्वाचा प्रश्न
मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पाटील यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयांमुळे मतदार गोंधळले आहेत. कोणत्या पक्षात ते राहणार, कुणाशी हातमिळवणी करणार याबाबत स्पष्टता नसल्याने जनतेत संभ्रम पसरला होता. निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी केलेल्या गुप्त बैठका, पक्षांतील सततच्या बदल्या आणि वक्तव्यांतील विसंगती यामुळे पाटील यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व कमी करून घेतल्याची चर्चा सुरू आहे.
जनतेचा विश्वास ढळला
स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे की, “पाटील साहेबांचा लोकांशी संपर्क कमी झाला आहे. ते कोणत्या पक्षात जाणार, कोणासोबत जाणार — याबाबत जनतेला गांभीर्य उरलेले नाही.” काही कार्यकर्त्यांनी तर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली की, “टांगा पलटी, घोडा फरार ही म्हण सध्या त्यांच्या नावाशी जोडली जात आहे.”
राजकीय समीकरणात अनिश्चितता
पाटील यांच्या निर्णयामुळे मतदारसंघात इतर पक्षही सावध झाले आहेत. काहींचे म्हणणे आहे की, त्यांच्या अनिश्चित भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला असून प्रतिस्पर्धी पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो.
राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, “नेत्याचा जनतेशी थेट संवाद तुटला की, लोकप्रियता टिकवणे कठीण होते. जनतेत असलेली असंतोषाची भावना आता उघडपणे दिसू लागली आहे.”
‘जनतेच्या मनातील नेता’ ही ओळख जपावी
जनतेकडून मिळणारा प्रतिसाद पाहता, माजी आमदारांनी पुन्हा जनतेत जाण्याची गरज आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. “नेत्याने पक्षांतर नव्हे, तर जनतेशी नातं दृढ केलं पाहिजे,” असा सल्लाही मतदारांकडून दिला जात आहे.