अमळनेर (लोक न्यूज):
अमळनेर शहरातील ताडेपुरा भागात तलावाजवळील परिसरात गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी व कचऱ्याचा प्रचंड त्रास सुरू झाला आहे. तलाव सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याने संबंधित ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात गटारीचे पाणी व सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद केल्यामुळे नागरिकांच्या घराजवळ सांडपाणी साचून राहिले आहे. परिणामी या भागात अस्वच्छतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.स्थानिक नागरिक राहुल भास्कर कंजर (रा. ताडेपुरा, अमळनेर) यांनी नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, "ठेकेदाराने तलाव सुशोभिकरणाच्या कामादरम्यान सांडपाण्याचा प्रवाह बंद केला आहे. त्यामुळे तलाव लगतच्या वस्तीत सांडपाणी साचून डेंगूचे डास, गोगलगायी, साप आणि इतर कीटकांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे."
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात दुर्गंधीचे वातावरण तयार झाले असून, लहान मुले व वृद्ध यांना आजारपणाचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी साप, बेडूक आणि इतर विषारी प्राण्यांचे संचार वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी केली आहे की, सांडपाण्याचा नैसर्गिक प्रवाह तात्काळ पूर्ववत करावा, तसेच परिसराची स्वच्छता मोहीम राबवून कीटकनाशक फवारणी करावी. तसेच सुशोभिकरणाचे काम करताना सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपरिषदेने या गंभीर तक्रारीकडे तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.