जळगाव (लोक न्यूज):
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि महाराष्ट्र विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी ‘प्रगतीशील महाराष्ट्र २०२५’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आगळेवेगळे प्रदर्शन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर ते बुधवार, दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ (जीएस ग्राऊंड) येथे रंगणार आहे.
हे प्रदर्शन खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने व दिल्लीच्या फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले असून, जळगावकरांसाठी ही एक अनोखी जनजागरण पर्वणी ठरणार आहे.
शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, तसेच फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.
🌟 उद्घाटन समारंभ
या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
मुख्य अतिथी म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, तसेच आमदार राजूमामा भोळे, मंगेशदादा चव्हाण, अनिलजी पाटील, किशोरजी आप्पा पाटील, अमोलदादा पाटील, चंद्रकांतदादा सोनवणे, चंद्रकांतदादा पाटील, अमोलजी जावळे आदी मान्यवर उपस्थित राहतील.
🏛️ विविध विभागांचे आकर्षक स्टॉल्स
‘एक उन्नत राष्ट्र की और…’ या घोषवाक्याखाली आयोजित या प्रदर्शनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्रदर्शनात पुढील विभाग आणि संस्थांचे माहितीपर स्टॉल्स असतील:
• कृषी व ग्रामीण विकास
• जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया
• विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
• पर्यावरण व जैव सुरक्षा विभाग
• आयुष व होमिओपॅथी संशोधन परिषद
• केंद्रीय मत्स्य पालन विभाग
• महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर
• केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
• नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, इंडियन फर्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड
• भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI)
• केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स
• भारतीय विमान प्राधिकरण, भारतीय चहा बोर्ड, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स
• राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळ
• महाराष्ट्र व ओडिशा बांबू मिशन
• आधार प्रकल्प, जळगाव महापालिका, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद
• कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ – इनक्युबेशन सेंटर
हे सर्व स्टॉल्स नागरिकांना प्रत्यक्ष माहिती, मार्गदर्शन आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया समजावून सांगतील.
👩🎓 विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम
या प्रदर्शनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी "शोध प्रकल्प स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील सुमारे आठ शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी आपले विज्ञान-तंत्रज्ञानविषयक प्रकल्प सादर करणार आहेत.
विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे तरुण पिढीला नवोन्मेष आणि संशोधनाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
🕙 वेळ व प्रवेश
प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत खुले राहणार आहे.
जळगावकरांनी आपल्या परिवारासह या ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संगमाला भेट देऊन प्रगतीशील महाराष्ट्राच्या वाटचालीत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले आहे.