लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळावा, तसेच त्यांच्यावर होणारी आर्थिक लूट थांबावी, अशी मागणी गावरानी जागल्या सेना अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील व अमळनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल जाधव यांनी केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार १२% आर्दतेच्या मकाला प्रती क्विंटल रु. २४००/- इतका किमान आधारभूत दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र बाजार समितीत विक्रीस येणारा मका साधारणतः २५% ते ३५% आर्दतेचा असल्याने, नियमांनुसार जास्तीच्या आद्रतेवर प्रती टक्का रु. २८/- या प्रमाणे कपात करून शेतकऱ्यांना प्रती क्विंटल रु. १८००/- ते रु. २०००/- इतका दर मिळणे अपेक्षित आहे.
परंतु वास्तवात शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा, असहायतेचा व मजबुरीचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून या मकाला केवळ रु. १२००/- ते १५००/- इतकाच दर दिला जात आहे. परिणामी प्रती क्विंटल शेतकऱ्यांची सुमारे रु. ५००/- ते ७००/- इतकी थेट आर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या अन्यायकारक व्यवहारांविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि योग्य दराने खरेदी व्हावी, यासाठी दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
सत्यशोधक विश्वासराव पाटील व हर्षल जाधव यांनी शासन व बाजार समिती प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून मका उत्पादक शेतकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवावेत, तसेच दोषी व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे.