लोक न्यूज
मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल हायस्कूल, अमळनेर येथील इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. डॅफोडील जगदीश सोनवणे हिची राज्यस्तरीय ‘Inspire Award – MANAK’ साठी निवड झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत या निवडी करण्यात येतात.
डॅफोडीलने सादर केलेले ‘हायड्रो बायसिकल’ हे पर्यावरणपूरक, ऊर्जा-बचतक्षम वाहतूक माध्यमाचे मॉडेल जिल्हास्तरीय परीक्षकांनी प्रशंसनीय ठरवले. धुळे येथे १४ व १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात एकूण १६५ मॉडेल्सपैकी फक्त १० मॉडेल्सची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली. यामध्ये डॅफोडीलच्या अभिनव संकल्पनेला मानाचा मुजरा मिळाला.
यापूर्वी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तिने जिल्हास्तरीय फेरीत दमदार कामगिरी केली होती. वैज्ञानिक दृष्टिकोन, तांत्रिक समज आणि सादरीकरण कौशल्य या सर्व बाबींमध्ये तिची कामगिरी उल्लेखनीय ठरल्यानेच तिची राज्यस्तरीय निवड शक्य झाली, असे आयोजन समितीने नमूद केले.
या यशामागे शाळेचे प्राचार्य श्री. लक्ष्मण सर, तसेच विज्ञान विषय शिक्षक श्री. रितिक जैन यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनीच्या राज्यस्तरीय निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. ओमप्रकाशजी मुंदडा, चेअरपर्सन सौ. छायाभाभीं मुंदडा, सचिव श्री. अमेय मुंदडा, सहसचिव श्री. योगेशजी मुंदडा, अन्य पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
डॅफोडील सोनवणेच्या या यशामुळे मुंदडा ग्लोबल हायस्कूलने पुन्हा एकदा विज्ञान क्षेत्रातील आपली कामगिरी अधोरेखित केली असून, पुढील राज्यस्तरीय फेरीतही ती तितक्याच आत्मविश्वासाने चमकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.