लोक न्यूज
अमळनेर : मोगरा देवीची शक्ती अंगात असल्याचे भासवून मुलाचे लग्न जमवून देईल ,पैसे दुप्पट करून देईल आणि सोन्याचे दागिने काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने १८ लाख रुपयात फसवल्याची घटना शहरातील बंगालीफाईल भागात फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडली. महिलेविरुद्ध जादू टोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेंद्र नारायण माळी रा रामवाडी बंगाली फाईल याने फिर्याद दिली की , १२ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याची आई भटाबाई माळी ही महादेव मंदिरात पूजेसाठी गेली असता तिला मोगरा देवी अंगात असलेली मंगलाबाई बापू पवार भेटली. व तिने भटाबाईला सांगितले की तुझ्या घरी लक्ष्मी नाराज आहे म्हणून तुझ्या मुलाचे लग्न जमत नाही. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी २५ हजार रुपये लागतील नाहीतर तुमच्यावर मोठे संकट येईल. भटाबाईने ही गोष्ट घरी आल्यावर सांगितले. त्यांनी मंगलबाईला पूजा करण्यास सांगितले त्याच दिवशी रात्री ११ वाजता मंगलाबाई त्यांच्या घरी गेली व त्याना सांगितले की तुमच्या घराच्या मागे कानबाई ची मूर्ती आहे आणि सोन्याच्या घागरी आहेत ते काढण्यासाठी साडे चार लाख रुपये आणून द्या. नारायण माळी यांनी दुसऱ्या दिवशी बँकेतून साडे चार लाख रुपये काढून दिले. हे पैसे धान्याच्या कोठीत ठेवावे लागतील असे सांगत ती बेडरूम मध्ये गेली आणि घरातील सर्वांना बाहेर काढून दरवाजा आतून लावून घेतला. पुन्हा चार दिवसांनी तिने घराच्या मागच्या बाजूने तांब्याची घागर काढून आणली व तिच्यात सोन्याचे दागिने आहेत असे सांगून साडे तीन लाखांची मागणी केली. पुन्हा तीने एकटीने बेडरूम मध्ये जाऊन साडे तीन लाखरूपये धान्याच्या कोठीत ठेवले. पुन्हा तिने तिसरी घागर काढून अडीच लाख रुपये मागितले , नंतर चवथी घागर काढून पुन्हा अडीच लाख रुपये मागितले. प्रत्येकवेळी तिने पैसे कोठीत ठेवण्याच्या नावे असे १४ लाख रुपये मागून घेतले.
पुन्हा मार्च महिन्यात तिने चमत्कारिकरित्या टोपलीतून देवीचा मुखवटा बाहेर काढला आणि पुन्हा अडीच लाख रुपये देवीच्या मुखवट्याजवळ ठेवायला लावले. तेही पैसे ती घरात एकटी जाऊन धान्याचे कोठीत ठेवून आल्याचे सांगितले. मात्र ती पैसे कोठे ठेवत होती हे घरच्यांना देखील माहीत नव्हते. जून महिन्यात तिने पुन्हा सोन्याच्या घागरी आणि सोन्याची देवीची मूर्ती काढण्यासाठी पूजेचे साहित्य लागेल म्हणून दीड लाख रुपये मागितले. घरमालकाचे पैसे संपले आणि त्यांनी आम्हाला सोने ,दुप्पट पैसे नको म्हणून आमचे पैसे कोठीतून काढून द्या असे सांगितल्यावर मंगलाबाई बापू पवार यांनी तुमच्या घरात पाच फणी नाग आहे तुम्ही घरात जाऊ नका म्हणून मनाई केली. त्यांनतर मंगलाबाईने सांगितले की मोगरा मातेच्या कृपेने माझ्या जादूमुळे तुमच्या घरात पैशाचा ढीग लागला आहे तो थांबवण्यासाठी तुम्हाला पुन्हा ८० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. पुन्हा ती ८० हजार रुपये घेऊन बेडरूम मध्ये गेली तेव्हा भाऊ दीपक माळी याने आरश्यातून पाहिले असता ती ८० हजार रुपये स्वतःच्या साडीत लपवत असल्याचे बघितले. नन्तर माळी कुटुंबाने धान्याच्या कोठीत ठेवलेले पैसे बघायला गेलं असता तेथे काहीच आढळून आले नाही. तेव्हा त्यांना फसवणूक झाल्याचे कळले. राजेंद्र माळी याने फिर्याद दिल्यावरून मंगलाबाई बापू पवार हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) ,३१८(२), ३१६(२) प्रमाणे तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.