लोक न्यूज
नरडाणा :- येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विदाऊट वर्दी, विदाऊट मास्क वाल्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. दंडात्मक कारवाई अत्यंत निष्ठूरतेने केली जात असल्याने, पोलिसांच्या या कारवाईचा सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, करोणा महामारीच्या संक्रमणामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नरडाणा पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढल्यानंतर नरडाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी खडबडून जागे झाले असून पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या विरुद्ध कारवाईचा बडगा उचलला आहे. विदाऊट मास्क धारकांवर कारवाई करताना कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचारी हे, विदाऊट वर्दी मध्ये आढळलेत. विना मास्क धारकांवर कारवाई करताना पोलिसांनी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला होता. ही कारवाई करताना महामार्गावरून बिनधास्त जाणाऱ्या अवैद्य प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांकडे पोलिसांनी मात्र डोळेझाक केली होती. अवैध प्रवासी वाहतुकीने खचाखच भरून जाणाऱ्य सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमा चे कोणतेही पालन न करणाऱ्या मालवाहतूक व खाजगी प्रवासी गाड्या पोलिसांच्या नजरेतून अर्थपूर्ण सहकार्याने सुटल्याची खमंग चर्चा सुरू होती.
महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन चालकांवर विना मास्क ची कारवाई करत असताना नरडाणा गावातील बाजारपेठेतील व गावातील रस्त्यावरून जाणारे बहुसंख्य नागरिक मात्र विना मास्क बिनधास्त जात होते. ज्या भागात पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे होते, त्या भागाला सोडून पोलिसांनी बेटावद रस्त्यालगतच्या "सोयीची चौफुली" निवडली होती अर्थात पोलिसांच्या या कारवाईमुळे महामार्गावरील चौफुलीच्या दुतर्फा वाहनचालकांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक बराच काळ वाहतूक खोळंबली होती. आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी किती विना मास्क धारकांवर कारवाई केली? व यातून पोलिसांनी किती रकमेचा महसूल गोळा केला? याची निश्चित आकडेवारी मात्र मिळू शकली नाही.