केवळ टेन्शनमुक्त होण्यासाठी आमचे अहवाल लवकर प्राप्त करा,
क्वांरटाईन व्यक्तींनी आ.अनिल पाटलांकडे व्यक्त केल्या भावना,कोरोनामुक्त महिलेचे केले कौतुक
अमळनेर-येथील प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आम्हाला आता समाधानकारक सुविधा व सेवा मिळत आहे,येथील सेवेकरी व डॉक्टर्स परके असताना आपुलकीने आमची काळजी घेत आहेत,केवळ मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी आमचे तपासणी अहवाल लवकर प्राप्त करावेत अशी विनंती वजा भावना या सेंटरमध्ये क्वांरटाईन असलेल्या महिला व पुरुषांनी आ.अनिल पाटलांकडे व्यक्त केल्या.
आ.अनिल पाटील यांनी आज दि 14 रोजी सकाळी या कोविड सेंटरमध्ये भेट देऊन क्वांरटाईन व्यक्तींशी चर्चा करत त्यांना धीर दिला.यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,डॉ संदीप जोशी यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.आमदारांनी प्रत्यक्ष क्वांरटाईन व्यक्तींशी स्वतः चर्चा केली.व काही समस्या असल्यास मनमोकळे पणे सांगावे असे सांगितले.यावेळी सर्वांनी याठिकाणी आम्हाला पुरेशा सुविधा मिळत असून निवास,आंघोळ व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.विशेष म्हणजे याठिकाणी असलेले डॉक्टर्स व कर्मचारी जी आपुलकीने सेवा आमची करीत आहेत ते आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत,हे सर्व जण परके असताना उत्तम काळजी आमची घेत आहेत,यामुळे आजस्थितीला आम्हाला कुठलीही अडचण नाही.,परंतु क्वांरटाईन केल्यानंतर आमचे स्वेब घेण्यात आले असताना ते लवकर प्राप्त होत नसल्याने कुठेतरी मनात भीती असते ही भीती घालविण्यासाठी लवकरात लवकर आमचे अहवाल प्राप्त करून द्या अशी विनंती सर्वांनीच आमदारांकडे केली,यावर आमदारांनी त्यांना दिलासा देत मी वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर तुमचे अहवाल प्राप्त करून देईल,तुम्ही कुणीही काळजी करू नका,लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या सोबत आहे.वेळोवेळी मी याठिकाणी भेट देऊन तुमची जास्तीतजास्त चांगली व्यवस्था कशी ठेवता येईल याचा प्रयत्न करणार आहे.कुणाचा अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी काळजी करायची नाही आपली मेडिकल टीम पूर्णपणे सज्ज असून त्यादृष्टीने सुविधा देखील आपण उपलब्ध केल्या आहेत,पॉझिटिव्ह व्यक्तींच्या काही वयक्तिक कौटुंबिक समस्या असल्यास त्यादेखील मला सांगाव्यात त्यादेखील सोडविण्याचा मी प्रयत्न करेल.आणि जसे अहवाल प्राप्त होतील त्यानुसार शासनाच्या गाईडलाईन घेऊन निगेटिव्ह व्यक्तींना लवकर मुक्त केले जाईल.आपण कोविड सेंटरमध्ये असलो तरी हे सेंटर आपल्या गावातच असल्याने आपण घरीच आहोत असे समजून टेन्शनमुक्त राहावे,माझ्यासह संपूर्ण प्रशासन तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही आमदारांनी सर्वाना दिली.आमदारांच्या या दिलासादायक वक्तव्याने सर्वांनी समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
बाधित महिला मुक्त झाल्याने आमदारांनी टाळ्या वाजवून केली बिदाई*
अमळनेर शहरातील एक बाधित महिला प्रताप महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल असताना योग्य ते उपचार याठिकाणी मिळाल्याने कोरोनाशी लढा देऊन सदर महिला या आजारातुन पूर्णपणे बरी झाल्याने त्या महिलेची आ.अनिल पाटलांच्या समक्ष येथून मुक्तता करण्यात आली.महिलेची तिच्या घरी बिदाई केली जात असताना आमदार अनिल पाटील यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करत महिलेचे कौतुक केले.,यावेळी आमदारांसोबत तहसीलदार मिलिंद वाघ, डॉ.प्रकाश ताडे अन्य डॉक्टर्स व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.