अमळनेर (प्रतिनिधी)
कोणी कितीही प्रयत्न केले तरी केंद्रात युतीचे सरकार आहे, राज्यातही युतीचेच सरकार येईल. म्हणून सत्तेच्या प्रवाहात राहूनच आपल्या अमळनेर तालुक्याची विकास कामे करवून घेता येणार असल्याने कार्यकर्त्यांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार शिरीष चौधरींनाच मतदार पुन्हा संधी देतील आणि अमळनेरकर सुज्ञ नागरीक मतपेटीतूनच ते दाखवून देतील, असा विश्वास भाजपानेते यूतीचे उमेदवार शिरीष दादा यांचे बंधू डॉ. रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत मिटकरींनी केलेले आरोपांनाही टोलवत खडेबोल सुनावले.
डॉ. चौधरी म्हणाले, मिटकरींनी आपली वक्तृत्व शैली मांडण्यासाठी निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांकडून मानधन घेऊन आपलेच मोल लावले आहे. त्यामुळे त्यांनी काल जी गरळ ओकली त्याचे प्रतिऊत्तर अमळनेरकर सुज्ञ नागरीक मतपेटीतूनच दाखवतील. मतदारांना विकाऊ म्हणणारे मिटकरींनी २ तासाच्या पोपटपंछीसाठी आपलेच मोल लावत साळसूद पणाचा आव आणला आहे, असा टोलाही भाजपा नेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी लगावला आहे. भाजपा सेना महायुतीचे उमेदवार शिरिष चौधरी यांची मतदार संघातून विकासपूरूष म्हणून जनमानसात प्रतिमा निर्माण झाली असताना सर्वसामान्य मतदारांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. मात्र, पडाऊ उमेदवाराने बिकाऊची रट लावून मतदारसंघ बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
पाडळसरेचे जलपूजन आम्हीच करू
पाडळसरे धरणाला युतीच्या कालखंडात सूरुवात झाली आणि आता जलपूजनही आम्हीच करू, त्याचे टेन्शन उपऱ्यांनी घेऊ नये. गत ५ वर्षांत पाडळसरे धरणाला २७० कोटीचा निधी युतीच्या शासनाने दिला. हा निधी ज्या हेडखाली येतो त्याच कामासाठी खर्च होतो. धरणाचे काम जितके महत्वाचे तेव्हढेच ज्या शेतकऱ्यांची शेती व ग्रामस्थांची घरे या धरणात जाणार आहे त्या गावांचे पुनर्वसन देखील महत्वाचे आहे. त्यासाठी हा निधी खर्च झाला आहे.
तर ज्या मिटकरींना अमळनेर कूठे आहे, ते माहित नाही, त्यांनी फक्त राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांवर दिशाहिन व खालच्या पातळीवर आरोप करून आपण फर्डा वक्ता असल्याचा आव आणला. जेव्हढे मिटकरींचे वय तेवढे त्या नेत्यांचे राजकारणात आयुष्य गेले आहे, असेही डॉ. चौधरी यांनी म्हटले आहे.