अमळनेर (लोक न्यूज)

तालुक्यातील गडखाम्ब शिवारात अमळनेर पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत सुमारे एक बिघा क्षेत्रात केलेली गांजाची बेकायदेशीर लागवड उद्ध्वस्त केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सुरेश लोटन पाटील (रा. गडखाम्ब) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गडखाम्ब शिवारातील गट क्रमांक २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने मका पिकासोबत गांजाची लागवड केली आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेतली. तसेच पंचनामा करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना सोबत घेण्यात आले.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर यांच्यासह हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील, विनोद पाटील आदींच्या पथकाने दि. ७ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता शेतावर छापा टाकला.
छाप्यात संबंधित शेतात सुमारे सहा फूट उंचीची गांजाची झाडे उगवलेली आढळून आली. तसेच पाच ते सात गोण्या ओला गांजा कापून बांधून ठेवलेला होता. एका ठिकाणी गांजा वाळवण्यासाठी टाकलेला असल्याचेही दिसून आले. प्राथमिक चौकशीत संबंधित शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी गांजा विकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून त्यांनी पंचनामा सुरू केला आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व गांजाची झाडे उपटून मुद्देमाल अधिकृतपणे जप्त करण्यात येणार आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.