अमळनेर | लोक न्यूज
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, तेही इंग्रजी माध्यमातून आणि माफक शुल्कात मिळावे या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूल ने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. कै. श्री. दादासाहेब वामनराव पवार यांच्या जन्मदिनानिमित्त शाळेच्या या प्रेरणादायी वाटचालीचा आढावा घेताना अभिमान वाटतो.

दुर्गा फाउंडेशनची स्थापना सन 2010 मध्ये झाली असून, संस्थेचे चेअरमन मा. श्री. उत्कर्ष पवार व सचिव सौ. अलका पवार यांच्या दूरदृष्टीतून सन 2014 मध्ये ढेकू (ता. अंमळनेर) येथे शाळेची प्रत्यक्ष सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात ना स्वतःची इमारत, ना विद्यार्थी – अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळेच्या संस्थापकांनी हार न मानता घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांचे प्रवेश केले.
नवीन शाळेबाबत पालकांमध्ये असलेली साशंकता हळूहळू विश्वासात बदलली. शाळेच्या दर्जेदार अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि पुढे शाळेचे स्थलांतर अंमळनेर येथील रामवाडी परिसरात करण्यात आले. सध्या शाळेला इयत्ता दहावीपर्यंत मान्यता असून वर्गखोल्यांच्या मर्यादेमुळे इयत्ता आठवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्याचा शाळेचा मानस आहे.
कोरोनापूर्व काळात विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने शाळा सकाळ-दुपार अशा दोन सत्रांत भरत असे व शाळेची स्वतःची बस सेवा देखील होती. मात्र कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे अवघड ठरले. मोबाईलची अनुपलब्धता व नेटवर्कच्या समस्यांमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. परिणामी विद्यार्थीसंख्या घटली आणि कोरोनानंतर शाळेसमोर मोठे आव्हान उभे राहिले.
तथापि, दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवत शाळेने पुन्हा प्रगतीचा वेग पकडला. आज शाळेत १७ गावांतील सुमारे ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. त्यामुळे अंमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात व्ही. एस. पवार इंग्लिश मिडीयम स्कूलने शिक्षणाच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
शैक्षणिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील आहे. नाट्यवाचन, चित्रकला, प्रज्ञाशोध, ऑलिम्पियाड, रंगोत्सव, मंथन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व तयारी करून दिली जाते. याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून विद्यार्थ्यांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Indian Talent Olympiad परीक्षेमध्ये शाळेला The Golden School Award प्राप्त झाला असून, शाळेच्या मुख्याध्यापिकांना Best Principal Award या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच रंगोत्सव या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलास्पर्धांमध्ये शाळेला Global School Award, Best School for Futuristic Education Award आणि India’s Activities Excellence Award असे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत.
विद्यार्थी कु. प्रांजल मनीषा सोनार (इयत्ता दुसरी) हिने ITO ऑलिम्पियाड परीक्षेत State Rank 4, State Topper व Scholarship मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. यासह अनेक विद्यार्थ्यांनी Classroom Topper व Excellence Medal Award प्राप्त केले आहेत.
शाळेत शारीरिक तंदुरुस्तीला विशेष महत्त्व देण्यात येते. दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना रेड, ब्ल्यू, येलो व ग्रीन अशा चार हाऊसमध्ये विभागून संघभावना व नेतृत्वगुण विकसित केले जातात. सह-अभ्यासक्रम, आंतरशालेय स्पर्धा, सण-उत्सव साजरे करणे, शैक्षणिक सहली, स्नेहसंमेलन व आनंदमेळावे यांद्वारे विद्यार्थ्यांचा सामाजिक, नैतिक व मानसिक विकास साधला जातो.
व्ही. एस. पवार स्कूलच्या कुटुंबात प्रशिक्षित, समर्पित शिक्षकवर्ग, प्रशासकीय व सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत. शिक्षक सतत विविध कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहून स्वतःला अद्ययावत ठेवतात. लवकरच शाळेची नवीन भव्य इमारत उभारली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
स्थापनेपासून अवघ्या तेरा वर्षांत शाळेने केलेली ही सर्वांगीण प्रगती संस्थेचे चेअरमन, सचिव, उपाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे, दूरदृष्टीचे व सामाजिक बांधिलकीचे फलित असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.