लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील अंबारे खापरखेडे येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येत असलेल्या सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान ‘अरूणोदय’ अंतर्गत विवाहपूर्व व प्रसूतिपूर्व समुपदेशन सत्र यशस्वीरीत्या पार पडले. राज्यातील एकवीस आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून सिकलसेल अॅनिमिया आजाराबाबत जनजागृती करणे, तपासणी व योग्य उपचाराची माहिती देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
हे समुपदेशन सत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साहील चौधरी व डॉ. विद्या देवरे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. आयुष्यमान आरोग्य केंद्र धार, ता. अमळनेर अंतर्गत हे सत्र घेण्यात आले.
या कार्यक्रमात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश गोकुळ पाटील यांनी सिकलसेल अॅनिमिया म्हणजे काय, हा आजार होण्याची कारणे, त्याची लक्षणे, संभाव्य धोके, उपचार पद्धती तसेच रुग्णांनी व कुटुंबीयांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थित लाभार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधानकारक निरसन देखील त्यांनी केले. तसेच आरोग्य सेवक श्री. डी. आर. पवार यांनी सिकलसेल अॅनिमियाची तपासणी शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत केली जाते, याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमास अंबारे खापरखेडे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री. अभिमन्यू झिपरू रायसिंग, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुनील पांडुरंग पाटील, प्राथमिक शिक्षक श्री. गणेश शामराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका कल्पना हंसराज पाटील, अंगणवाडी सेविका सुनंदा भिकनराव देसले, मदतनीस विजया दिनेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी हंसराज पाटील तसेच पलक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये सिकलसेल अॅनिमिया आजाराबाबत जागरूकता निर्माण होऊन आरोग्य तपासणीसाठी पुढे येण्याची सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.