लोक न्यूज
अमळनेर – ताडेपुरा परिसरातील तलावाबाबत अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत जोरदार मोर्चा काढला. “ताडेपुरा तलाव हा नैसर्गिक पाण्याचा स्रोत नसून ते गटारीचे पाणी साचलेले आहे, त्यामुळे येथे उद्यान होऊ शकत नाही,” असे निकम यांनी केलेले वक्तव्य चुकीचे व दिशाभूल करणारे असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या वक्तव्याच्या निषेधार्थ ताडेपुरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी करत त्यांनी मोर्चा काढत आपला तीव्र रोष व्यक्त केला. “ताडेपुरा तलाव हा परिसरासाठी महत्त्वाचा जलस्रोत असून त्याबाबत अशा प्रकारचे अपमानास्पद व चुकीचे विधान सहन केले जाणार नाही,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
मोर्चादरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे तलावाच्या विकासाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. तसेच, तलावाचे जतन व सुशोभीकरण करून येथे उद्यान उभारण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांच्या या आंदोलनामुळे ताडेपुरा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत नागरिकांचे निवेदन स्वीकारले असून पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.