लोक न्यूज
अमळनेर : शहरात वाढत चाललेल्या बुलेट मोटरसायकलच्या सायलेन्सरमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय पोलीस उपनिरीक्षक यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात बुलेट मोटरसायकलवरील अवैध सायलेन्सरविरोधात विशेष कारवाई करण्यात आली.
सदर आदेशाचे पालन करत अमळनेर शहरातील विविध भागांमध्ये तपास मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान नियमबाह्य सायलेन्सर लावलेल्या बुलेट मोटरसायकलधारकांवर कारवाई करण्यात आली. एकूण १५ केसेस दाखल करण्यात आल्या असून संबंधित वाहनचालकांकडून एकूण ८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
वाहनांमधील अवैध बदलांमुळे ध्वनीप्रदूषण वाढून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून कायदेशीर सायलेन्सरच वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.