लोक न्यूज
अमळनेर ः- येथील पालिकेच्या पहिल्याच सभेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्येक विषयाला अभ्यासपूर्ण विचारणा केली. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताविरूद्ध असलेल्या विषयांना कडाडून विरोध केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चांगलाच ब्रेक लागला.
सभेमध्ये सर्वात जास्त हस्तांतरण फीचा मुद्दा गाजला. अत्यंत गैरवाजवी असलेली 2 टक्के हस्तांतरण फी अगदीच नाममात्र ठेवावी अशी मागणी शहर विकास आघाडीने लावून धरली होती. अखेर सभेत एक टक्का फी मंजूर करा. जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याहीपेक्षा कमी करण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवू असे सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्याने सदर विषय मंजूर झाला. हस्तांतरण फी अतिशय अवाजवी आहे, याबाबत ज्यांनी मोर्चे काढले. निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे केले त्यांनीही फी कमी करण्याबाबत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलटपक्षी सत्तेत असल्याने केवळ बघ्याची भूमिका घेतली.
हस्तांतरण फी वाढ, शहरातील स्वच्छतेच्या समस्या, प्रशासकीय अनागोफ्लदी याबाबत स्वीकृत सदस्य डॉ. डिगंबर महाले यांनी अत्यंत प्रखर विरोधकाची भूमिका घेतली. त्यांनी विचारलेल्या अनेक अभ्यासपूर्ण प्रश्नांना विविध विभागप्रमुख आणि संबंधित जबाबदार सूत्रांना धड उत्तरेही देता येत नव्हते.
सर्वात वाईट म्हणजे सौ. जयश्रीताई पाटील या विद्यमान नगरसेविका असल्या तरी त्या माजी नगराध्यक्षाही आहेत. त्यांच्यासह शहर विकास आघाडीच्या अन्य नगरसेविकांनाही सभागृहाच्या शेवटी जागा दिली. त्यावरून सौ. जयश्रीताई पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शविआच्या नगरसेवकांनीही ही बाब अत्यंत अशोभनिय असल्याचे बोलून दाखविले. त्यामुळे यापुढे सन्मानपूर्वक जागेवर महिलांना बसविले जाईल असे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले.
अत्यंत गोलमोल विषय व संदिग्ध टिपण्या आणि सत्ताधारी नगरसेवकांचा वारंवारचा हस्तक्षेपी गोंधळ यावरून डॉ. डिगंबर महाले यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. ही सभा सर्वार्थाने डॉ. महाले यांनी आक्रमकतेला अभ्यासूपणाची जोड देवून चांगलीच गाजवली आणि वाजवलीही. सत्ताधाऱ्यांच्या गोफ्लधळाबाबत शविआच्या नगरसेविकांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. शविआच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील अत्यावश्यक सेवा- सुविधा पुरविण्याबाबत पालिका करीत असलेल्या दुजाभावाबद्दल अयोग्य विषय व गोलमाल टिपण्या यावरून शविआच्या राजू फापोरेकर, गोपी कासार, भरत ललवाणी, सचिन पाटील, विजय पाटील, देवेंद्र कांबळे, प्रा. सौ. योगिता कापडणेकर, सौ. स्वप्ना पाटील, सौ. शोभाबाई गढरे, सौ. नंदा संदानशिव, जुबेदाबी शेख, अफसाना खाटीक, सौ. कविता राजपूत यांनी तीव्र आक्षेप घेतला.
या एकूण कामकाजात नगरसेवक पंकज चौधरी यांनी त्यांचे बोलणे झाल्यावर ‘माझा शेर वाचायचा राहून गेला’ असे म्हणत कोणीतरी मोबाईलवर पाठविलेला शेर अडखडत वाचला. त्याला दुसऱ्याच सेकंदाला डॉ. डिगंबर महाले यांनी तोंडीपाठ असलेल्या एका शेरनेच उत्तर देवून बोलती बंद केली. हा प्रसंग सर्वात जास्त चर्चिला जात आहे.
शविआने केवळ विरोधाला विरोध अशी भूमिका न ठेवता जनहिताच्या विषयांना जोरदार समर्थनही दिले. त्यात शहरात शंभर बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्वाती परदेशी यांनी मागणी केल्यावरून बालकांना दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, शहीद जवानांच्या परिवाराला करमाफी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील संकुलाला डॉ. बाबासाहेबांचे नाव देणे यासारख्या विषयांना शविआने उत्स्फूर्त जोरदार समर्थन दिले. पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांचेही शविआने कौतुक केले.