अमळनेर (लोक न्यूज) – क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अनिल शिंदे यांची तब्बल १ कोटी ६५ लाख ५७ हजार २०४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. २१ जानेवारी ते ११ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला.
‘सोलोनॉय’ नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगून संशयितांनी सुरुवातीला कमी रकमेवर नफा दाखवून विश्वास संपादन केला. पहिल्या टप्प्यातील गुंतवणुकीवर सुमारे १ लाख ४३ हजार रुपयांचा नफा खात्यात दाखवण्यात आला. त्यामुळे विश्वास बसल्यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवण्यास भाग पाडले.
झाशी प्रवीण पाटील नावाच्या महिलेने व तिच्या साथीदारांनी विविध मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधत सतत अधिक गुंतवणुकीचा दबाव टाकला. त्यांच्या सांगण्यावरून डॉ. शिंदे यांनी आपल्या खात्यातून एकूण १ कोटी ६५ लाखांहून अधिक रक्कम ऑनलाईन व्यवहारातून पाठवली. मात्र नफा तर दूरच, मूळ रक्कमही परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी डॉ. अनिल नथू शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.