लोक न्यूज
अमळनेर तालुक्यातील डांगर (उदयनगर) गावाजवळ भरदिवसा घडलेल्या थरारक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. रस्त्यावर मोटारसायकल चालवताना फोनवर बोलणाऱ्या तरुणाला “गाडी नीट चालवा” अशी साधी समज दिल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाने साथीदारांना पाचारण करत ट्रॅक्टर आडवे लावून कार अडवली आणि कारवर निर्घृण दगडफेक केली. या हल्ल्यात कारचे मोठे नुकसान झाले असून फिर्यादीच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटून गहाळ झाली आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी तुषार लालचंद पवार (रा. शारदा कॉलनी, वड चौक, अमळनेर) हे त्यांचे नातेवाईक निरंजन पवार, मकरंद पवार व मित्र दीप नागडा याला सोडण्यासाठी धुळे येथे गेले होते. दुपारी सुमारे ३.३० वाजता मित्राला सोडून ते टोयोटा हायरायडर (एमएच-५४/बी-७००७) या कारने अमळनेरकडे परतत होते.
कोंडावळ फाट्याजवळून पुढे येत असताना, विनाक्रमांक मोटारसायकलवर एक २३ वर्षीय तरुण फोनवर बोलत बेदरकारपणे वाहन चालवत होता. फोनच्या नादात तो कारसमोर आडवा येत असल्याने चालक निरंजन पवार यांनी कार थांबवून त्याला “फोनवर बोलू नका, गाडी नीट चालवा” अशी समज दिली. या सूचनेचा राग आल्याने संबंधित तरुणाने कारचा फोटो काढून तो व्हॉट्सअॅपवर कोणाला तरी पाठवला आणि “तुम्ही पुढे चला, तुम्हाला दाखवतो,” अशी उघड धमकी देत तेथून निघून गेला.
ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता रोखला
कार डांगर गावाच्या बसस्टँडजवळ पोहोचताच, लाल रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या मधोमध आडवे उभे केलेले दिसले. कार थांबवून रस्ता का अडवला आहे, अशी विचारणा करताच मोटारसायकलवरील तरुण ३-४ साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाला.
यानंतर आरोपींनी हातातील दगडांनी कारवर तुफान हल्ला चढवला. कारच्या काचा फोडण्यात आल्या. चालकाने वाहन बाजूला काढण्याचा प्रयत्न करताच ट्रॅक्टर चालकाने जाणीवपूर्वक धडक देऊन कारचे अधिक नुकसान केले.
मोबाईल फोडला, सोन्याची चैन गहाळ
हल्ल्यादरम्यान तुषार पवार यांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू केले. हे लक्षात येताच एका आरोपीने कारची खिडकी फोडून त्यांच्या हातातील मोबाईलवर दगड मारला. त्यामुळे मोबाईलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
झटापटीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे २३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटून खाली पडली व गोंधळात गहाळ झाली. जीव वाचवण्यासाठी चालकाने कच्च्या रस्त्याने कार काढून तेथून सुटका केली.
चौघांची नावे निष्पन्न
घटनास्थळी चित्रीत केलेल्या व्हिडिओच्या आधारे आणि पोलिसांच्या चौकशीतून संशयित आरोपींची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये
• शुभम सुनील पाटील
• मुकेश प्रकाश सोनवणे
• सुनील धडकू पाटील
• धीरज सुनील पाटील
(सर्व रा. डांगर बु।।, ता. अमळनेर)
यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
अमळनेर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ११८(१), १२६(२), १२५(अ), ३५१(२), ३५२ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल काशिनाथ नामदेव पाटील करीत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या दहशतवादी पद्धतीच्या गुंडगिरीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.