लोक न्यूज
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२५ – राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्राने राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद/नगरपंचायत यांच्या आगामी निवडणुकांसाठी प्राथमिक मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित केली आहे. ही यादी मतदारांना आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी वापरता येणार आहे.
आयोगाने मतदारांना सुविधा देण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन नाव शोधण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. येथे कोणत्याही मतदाराला आपले मतदार क्रमांक आणि नाव तपासता येईल.
मतदार यादी कशी तयार केली गेली?
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अर्हतादिनांक (Qualifying Date) म्हणून निश्चित केला आहे. त्यानुसार या तारखेपर्यंत अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीचा आधार घेऊन प्राथमिक मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा उपयोग होणार आहे.
ऑफलाईन उपलब्धता:
जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्राथमिक मतदार यादीची छापील प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल. तसेच नगरपरिषद व नगरपंचायत मतदार यादीची छापील प्रत त्यांच्या कार्यालयांमध्ये देखील पाहता येईल. या छापील प्रतसाठी प्रति पाने दोन रुपये शुल्क लागणार आहे.
अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक:
मतदारांना अधिक सुविधा देण्यासाठी, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mahasec.maharashtra.gov.in/ या लिंकवर देखील स्वतंत्र नाव शोधण्याची सोय उपलब्ध आहे.
मतदार यादी डाउनलोड करण्याची सोय:
प्राथमिक तसेच अंतिम मतदार यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी आयोगाने https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या लिंकवर सुविधा दिली आहे. यामुळे मतदारांना घरबसल्या यादी पाहता येईल