लोक न्यूज
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वात अवघड व धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या घाटावर दरवर्षी अनेक अपघात होत असून वाहतूक कोंडी व प्रवासातील विलंब हे गंभीर प्रश्न आहेत. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून केंद्र सरकारने औट्रम घाट परिसरात ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ₹२,४३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, टेलवाडी ते बोधरे या सुमारे १५ किलोमीटरच्या टप्प्यात हा बोगदा उभारला जाणार आहे.
“औट्रम घाट आता इतिहासजमा होणार” — खासदार स्मिता वाघ
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, “औट्रम घाट हा नागरिकांसाठी कायम धोकादायक ठिकाण ठरला होता. अनेक अपघातांमुळे जनतेत नाराजी होती. सुरक्षित बोगदा उभारावा, ही जनतेची मागणी होती आणि त्या दृष्टीने आम्ही वारंवार केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला. अखेर केंद्र सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरेल.”
त्या पुढे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. या बोगदा प्रकल्पामुळे इंधन व वेळेची बचत, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होईल.”


प्रकल्पाचे तांत्रिक तपशील
• बोगद्याची लांबी: ५.५० किमी
• रस्त्याचा विस्तार: टेलवाडी ते बोधरे (१५ किमी)
• एकूण खर्च: ₹२,४३५ कोटी
• वाहन वेग: ताशी १०० किमी पर्यंत
• रचना: डबल ट्यूब स्ट्रक्चर, अत्याधुनिक वायुवीजन, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग
• सुरक्षा सुविधा: फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही, वाहन नियंत्रण केंद्र