लोक न्यूज
अवर्षण आणि अतिवृष्टीच्या दुष्परिणामामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातातून गेला असून, शासन नुकसानभरपाईबाबत टाळाटाळ करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता उपविभागीय कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.जून महिन्यात पेरणी झाल्यानंतर पावसाने दांडी मारल्याने सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. १५ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडल्याने उडीद, मूग, सोयाबीन व मका पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत सतत पाऊस झाल्याने कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी, शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम अपयशी ठरला.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचनाम्यानुसार फक्त १,५८६ शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने महाविकास आघाडीकडून काही ठोस मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांमध्ये —
• अमळनेर तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा
• शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५०,००० मदत द्यावी
• सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन ७/१२ कोरे करावेत
• २०२१ च्या अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे
• मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर यांची हमीभावाने शासकीय खरेदी सुरू करावी
• खरीप पिकांसाठी पीकविमा मंजूर करावा
या मोर्चात माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जमावे, असे आवाहन किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा. अशोक पवार, सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुकाध्यक्ष राजेंद्र मराठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी तसेच कारभारी आहेर, धनगर पाटील, प्रशांत निकम, देवेंद्र देशमुख, गजेंद्र साळुंखे, संदीप घोरपडे, चंद्रशेखर भावसार, मोहन भोई, दिनेश पवार आणि मनोहर पाटील यांनी केले आहे.