लोक न्यूज
अमळगाव (ता.अमळनेर, जि.जळगाव) – दि. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जि.प. प्राथमिक केंद्रशाळा अमळगाव येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. जयेश कोळी, श्री. वसंत कोळी, श्री. गोपाल कोळी तसेच अनेक समाजबांधव, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. पूजनानंतर शाळेचे शिक्षक श्री. अरुण पाटील सर यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनावरील माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी वाल्मिकी ऋषींच्या रामायणातील योगदानाची माहिती सांगितली तसेच त्यांच्या महान कार्यातून आपणाला मिळणारे प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, महापुरुषांचे योगदान आणि मूल्यशिक्षण यांची जाणीव निर्माण झाली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देखील वाल्मिकी जयंतीचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य आणि माहिती सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सौ. विद्या गजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन सौ. पुनम बोरसे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रवीण महाजन सरांनी मानले.
महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, समतेचा संदेश आणि मूल्याधारित शिक्षणाचा संकल्प घेण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शांत, भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.