लोक न्यूज
अमळनेर, दि. ८ ऑक्टोबर :
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. भूषण रामकृष्ण गवई साहेब यांच्यावर अॅड. पांडे राकेश किशोर यांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, अमळनेर वकील संघाने आज एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.
या संदर्भात वकील संघाची तातडीची बैठक काल (दि. ७ ऑक्टोबर) अध्यक्ष अॅड. किरण अ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करून आज (दि. ८ ऑक्टोबर) न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमळनेर वकील संघाने जिल्हा व सत्र न्यायाधीश, अमळनेर यांना निवेदन सादर केले असून, या निवेदनाच्या प्रती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच अमळनेर येथील वरिष्ठ आणि कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांना देण्यात आल्या आहेत.
संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, “हा हल्ला केवळ मा. मुख्य न्यायमूर्ती गवई साहेबांवर झालेला नसून तो न्यायव्यवस्था आणि संविधानाच्या मूल्यांवर झालेला आघात आहे. अशा घटनांचा तीव्र निषेध करत न्यायव्यवस्थेच्या गौरवाचे रक्षण करण्यासाठी वकील संघ एकजुटीने उभा आहे.”
या कामबंद आंदोलनामुळे अमळनेर न्यायालय परिसरातील नियमित कामकाजावर परिणाम झाला असून, सर्व वकीलांनी शांततेत निषेध नोंदविला.