लोक न्यूज
शहरातील धार रस्त्यावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका ३२ वर्षीय इसमाचे कुजलेले प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना १३ ऑक्टोबरच्या सायंकाळी उघडकीस आली.
सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह चिन्मय हॉटेलसमोर माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांच्या शेताजवळ ‘लोखंडी’ नावाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, त्यांचे सहकारी तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रेत कुजलेल्या अवस्थेत असून, मृत इसमाच्या अंगावर फक्त निळ्या रंगाची पॅन्ट होती.
या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत इसमाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित व्यक्तीची ओळख पटल्यास तातडीने अमळनेर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.