लोक न्यूज
अमळनेर-खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते व औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने योग्य नियोजन करावे तसेच बोगस बियाणे, खते व औषधी विक्रीबाबत कठोर कार्यवाही करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी खरीप हंगाम 2025-26 साठी झालेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकित दिले.
अमळनेर येथे नगरपालिका सभागृहात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम 2025-26 साठी तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीस आमदार अनिल पाटील यांनी मुंबईहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले. खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची इनपुट्सची (बियाणे, औषधे, खते) टंचाई जाणवू नये, याकरिता वेळेत वितरणाची व्यवस्था करण्याबाबत सूचनाही आमदारांनी दिल्या.तसेच पिकविमा योजना, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान यासंदर्भात त्वरित पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आमदारांनी प्रांत अधिकारी व तहसीलदारांना यांना दिले.यावेळी शेतकऱ्यांची केवायसी व अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत पूर्ण व्हावी यासाठी ऑनलाईन आढावा घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे होते. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, रोजगार हमी योजना, जलतारा योजना व इतर कृषी अनुषंगिक योजनांचा आढावा घेतला तर तहसीलदार सुराणा यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा यावर आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी चंद्रशेखर साठे यांनी खरीप हंगाम नियोजनाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे तालुक्याच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांचा मागणी-पुरवठा ताळमेळ, तसेच विविध योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. या बैठकीतून आगामी खरीप हंगामाचे प्रभावी नियोजन, शेतकऱ्यांसाठी सुलभ सेवा आणि शाश्वत उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यास कृषी विभाग सज्ज असल्याचे अधोरेखित झाले.