Lok news-

जळगाव, दि. ७ मे २०२५ – जळगाव लोकसभा मतदारसंघातील विविध भागात काल झालेल्या अचानक वादळी वाऱ्यांसह पावसामुळे केळी, पपईसारख्या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक भागांतील बागायती पिके जमीनदोस्त झाली असून, गुरे-ढोरे जनावरांचाही जीवितहानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदार स्मिताताई वाघ यांनी तात्काळ जलसंपदा मंत्री मा. गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.
          खासदार स्मिताताई वाघ यांनी आज स्वतः विविध गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. केळी-पपईच्या बागायतींमधील नुकसान, वादळात मृत्युमुखी पडलेली जनावरे तसेच शेतकऱ्यांवरील आर्थिक भार यांचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांच्या सोबत महसूल व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते दौऱ्यात त्यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवकांना स्पष्ट निर्देश दिले की, तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल.
            खासदार वाघ यांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना धीर दिला.