लोक न्यूज
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना गणित समजण्याविषयी सुसूत्रता यावी व सोपे व्हावे यासाठी पियर लर्निंग अर्थात सहा अध्याय पद्धतीने शिक्षणाचा वर्षभर उपक्रम गणित शिक्षक डी ए धनगर यांनी मुख्याध्यापक सुनील पाटील व संस्थाध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने राबवला.
     सर्वसाधारणपणे गणित शिकण्याच्या विद्यार्थ्यांच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणावर न्यूनगंड असल्याचे जाणवते. बऱ्याच वेळेस गणितातील अमूर्त संकल्पना काही विद्यार्थ्यांना समजत नाही. जरी ती संकल्पना समजली नाही तरी विद्यार्थी गणित शिक्षकांना प्रश्न विचारायला घाबरतो. किंवा मी विचारलं तर इतर विद्यार्थी हसतील या विचाराने तो शिक्षकांना अडचणी विचारातच नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांच्या मानाने तो अध्ययनक्षम होत नाही. सदर संकल्पना त्याला न समजल्यामुळे तो न्यूनगंडाच्या गर्तेत अडकतो. आणि गणित शिकण्याच्या प्रक्रियेतून हळूहळू लांब जायला लागतो. असे होऊ नये यासाठी साने गुरुजी विद्यालयातील गणित शिक्षक डी ए धनगर यांनी सहअद्यायी पद्धतीचे गट तयार केले, व आनंददायी शिक्षणाची अनुभूती दिली. प्रत्येक गटाचा गटप्रमुख पेरेंट लीडर म्हणून निवडला गेला. अर्थात वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना गणितात चांगली गती आहे अशा विद्यार्थ्यांना पॅरेंट लीडर म्हणून नेमण्यात आले. त्यात तनय पाटील, मेहुल पाटील, शुभम पाटील, कुलदीप शिसोदे, निशांत पाटील, मोहित पवार व जयेश देशमुख यांच्यावर पॅरेंटलीडर ची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी वर्षभर आपल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संकल्पना विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच न समजलेली संकल्पना स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला. परिणामी गटातील विद्यार्थी त्यांच्याकडे आनंदाने प्रश्न विचारू लागले. त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगून स्वतःचा अभ्यासाचे दृढीकरण करून घेतले. तसेच प्रत्येक पेरेंटलिडरने आपल्या गटातील विद्यार्थ्यांनी घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला आहे किंवा नाही याची खातरजमा करून घेतली. त्यामुळे आपसूकच गणित विषयाच्या उदाहरणांचा सोडवण्याचा सराव विद्यार्थ्यांना झाला. तसेच वेळोवेळी राबवलेले विविध उपक्रम आपल्या गटातील किती विद्यार्थ्यांनी पूर्ण केले हे सुद्धा तपासले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी गणितात प्रयोगशील, कृतिशील,  कार्यान्वित होऊन, गणिताविषयी आवड निर्माण करण्यात यशस्वी झाले. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा गणितातील अध्ययन स्तर उंचावला. ज्या स्तराला विद्यार्थी होता त्यापेक्षा वरच्या स्तराला विद्यार्थी पोहोचला त्यामुळे पालकांनी व समाजातील इतर घटकांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांचे तोंड भरून कौतुक केले. ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड विषय वाटत होता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता गणित विषय थोड्याफार प्रमाणात आवडू लागला हेच या उपक्रमाचे फलित आहे. विविध नवोउपक्रमांमुळे अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने मोलाची मदत झाली. विद्यार्थी अध्ययनक्षम होऊन होऊन त्यांना गणित शिकण्या, समजण्यात सोईचे झाले.