लोक न्यूज-
अमळनेर -  तालुक्यातील मुडी प्र.डा. व बोदर्डे  परिसरातील पांझरा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू उत्खन्नन व वाहतूक सुरू आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या गौण खनिजाची लूट थांबवावी व वाळू तस्कारांचा बिमोड करावा या मागणीचे निवेदन मुडी प्र.डा. व बोदर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांसह ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे. 
या निवेदनात नमूद आहे की, मुडी प्र.डा.व बोदर्डे येथील पांझरा नदीपात्रातून अमळनेर व परिसरातील वाळू तस्कर रात्रीच्या वेळी अवैधरित्या वाळू उत्खन्नन व ट्रॅक्टर, डंपरद्वारे वाहतूक करत आहेत. हे वाळू तस्कर मुजोर व गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर गावपातळीवरून निर्बंध घालण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र ही मंडळी जुमानत नाही. त्यामुळे आपण गांभीर्याने दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, माजी सरपंच विजय पाटील, संजय युवराज पाटील, लोकनियुक्त सरपंच काशिनाथ महाजन, उपसरपंच नारायण वेडु पाटील, गजेंद्र सोनवणे, गुणवंत पाटील, नाना चौधरी, किशोर पाटील, गोकुळ पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

दोन तलाठ्यांना धक्काबुक्की!
तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास नदीपात्रात सहा ट्रॅक्टर वाळू भरताना दिसून आले. यापैकी दोन ट्रॅक्टर ग्रामस्थांनी धाडस करून पकडले आणि तलाठ्यांना यासंदर्भात माहिती देत बोलविण्यात आले. ग्रामस्थांनी रात्रभर जागरण करत तलाठ्यांची वाट बघितली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास आलेले शिंदे व देसले या तलाठ्यांना दमदाटी व धक्काबुक्की करण्यात आली एवढी मुजोरी या वाळू तस्करांची वाढलेली आहे. ही बाब प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या कानावर ग्रामस्थांनी घातली. काही चिरीमिरी घेणार्‍या तलाठ्यांमुळे ईमाने-ईतबारे काम करणारे तलाठी भरडले जात आहेत.