लोक न्यूज -
अमळनेर : न्यायालयाची दखल , पोलिसांची कारवाई आणि समाज प्रबोधनाला प्रतिसाद देत अमळनेरात एका कुटुंबाने आपल्या घराबाहेर येथे वेश्या व्यवसाय होत नाही , कुणीविचारणा केल्यास पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल असा फलकच लावल्याने सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला.
अमळनेरात अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय जोरात सुरू होता. अनेकदा याविरोधात आंदोलने झाली. उच्च न्यायालयात तक्रारी गेल्या. अनेकदा आंबट शौकीन सामान्य नागरिकांच्या घरात घुसून त्यांची बदनामी होत असल्याने , त्यांच्या कुटुंबातील मुलींचे लग्न होत नसल्याने कुदरत अली यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वेश्या व्यवसाय बंदीची मागणी केली होती. न्यायालयाने या भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले होते. मात्र तत्कालीन पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या काळात सी सी टी व्ही कॅमेरे ही खराब करण्यात आले. नियोजन नसल्याने पुन्हा व्यवसाय जोरात सुरू झाला. म्हणून कुदरत अली यांनी पुन्हा न्यायालयात तक्रार केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दोन मालकीणींवर कारवाई करून त्यांना अटक केली तर आठ पीडित महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात आले. त्यांनतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , ऍड शकील काझी यांनी दसऱ्याच्या दिवशी त्या कुटुंबांचे प्रबोधन करून वेश्याव्यवसायपासून परावृत्त होण्याची विनंती करत कायदेशीर कारवाईची तंबीही दिली. याला प्रतिसाद म्हणून एका कुटुंबाने आपल्या घराबाहेर प्रवेश निशिब्ध करून येथे वेश्या व्यवसाय होत नाही व कुणी विचारल्यास पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल असा इशारा देऊन आंबट शौकिनाना इशारा दिला आहे.
अशपाक शेख याने पोलिसांना अर्ज देऊन संरक्षणाची मागणी करून सन्मानाने जगायचे आहे. कुटुंबाला वेगळ्या दिशेने न्यायचे आहे असे सांगितले.
जनतेने सहभाग घेतला तर आणखी प्रतिसाद मिळून या महिला देखील आपला गैरव्यवसाय सोडून समाजात इतरांप्रमाणे जगू शकतील असे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सांगितले