अमळनेर(रिपोर्ट)
अक्कलपाडा धरण 100 टक्के भरल्याने पांझरा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता असून काठावरील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काठावरील गावकऱ्यांनी सावध राहावे असे आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे.
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेला मालनगाव मध्यम प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे व जामखेडी मध्यम प्रकल्प, ता. साक्री, जि. धुळे हे प्रकल्प 100 टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे 1610 व 419 क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे रविवारी सकाळी 9 वाजता 2 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले असून 2080 क्यूसेक्स एवढा विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर तालुक्यातील गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन. महसूल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
