लोक न्यूज
अमळनेर, लोक न्यूज : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत DL Social Foundation च्या अधिकृत शुभारंभ सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता इंदिरा भवन, स्वामी नारायण मंदिरामागे, स्टेशन रोड, अमळनेर येथे करण्यात आले आहे.
संस्थेच्या शुभारंभानिमित्त ‘ज्ञानदीप अभियान’ या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार असून, "शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत" या संकल्पनेतून अमळनेर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू १,००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.
DL Social Foundation ने समाजहित, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण तसेच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. समाजातील वंचित, गरजू आणि होतकरू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, भविष्यातही अनेक विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
संस्थेचे संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका सौ. भावना मैराळे यांनी अमळनेर तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या सामाजिक कार्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे.
तसेच तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांनी शैक्षणिक मदतीसाठी DL Social Foundation शी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. पात्र विद्यार्थ्यांना संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी फाउंडेशन सदैव कटिबद्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.